
काली बुरुज, तटबंदीने घेतला मोकळा श्वास
– पन्हाळगडावर ऐतिहासिक वास्तू संवर्धन मोहीम
– जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांचाही सहभाग
*पन्हाळा : किल्ले पन्हाळा गडावर शिवराष्ट्र हायकर्स संस्थेच्या वतीने काली बुरुज परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. येथील बुरूज आणि तटबंदीवरील अनेक वर्षांपासून वाढत आलेली झाडेझुडपे काढण्यात आली. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूने मोकळा श्वास घेतला. या मोहिमेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांनीही संवर्धन मोहिमेत सहभाग घेतला आणि तटबंदी साफसफाई करून संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला. सकाळपासून सुरू झालेली मोहीम दुपारपर्यंत चालली. या संवर्धन मोहिमेत 50 हून अधिक युवक सहभागी झाले होते. कृतिशील शिवजयंती अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राजेंद्र पोवार, जिल्हाध्यक्ष मोहन खोत, श्रेयश भंडारी, अभिजीत पवार, अमित पोरलेकर, प्रतापराव इंगळे, प्रदीप पाटील, इंद्रजीत पवार, उमरफारूक मुजावर, गणेश कदम, अक्षय चौगुले, राहुल पोवार, विजय खोत, रमेश जाधव आदी गड संवर्धन मोहिमेत सहभागी झाले होते.