
कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि १३ डिसेंबर २०२१ रोजी श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ धाम येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपातर्फे हा कार्यक्रम “दिव्य काशी – भव्य काशी’ म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणार आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ७ वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. या योजनांचे लोकार्पण मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमात संपूर्ण देशभरातील धर्माचार्य, साधू संत, विद्वान-विचारवंत तसेच उत्तर प्रदेश सह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १३ डिसेंबर २०२१ रोजी सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. देशभरात सुमारे ५१ हजार ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने सुद्धा श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ धाम येथील लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्री काशी विश्वेश्वर मंदिर, अंबाबाई मंदिरनजीक कोल्हापूर येथे सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक साधू संत, महंत, धर्माचार्य हे उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.