
मुंबई : ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सिल्वर ओक या निवासस्थानी येताच त्यांचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कौतुक व अभिनंदनही केले. ग्रामविकास विभागाने विधवा कुप्रथा बंद करण्यासंदर्भात काढलेल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचाही खासदार सुप्रियाताईनी आवर्जून उल्लेख केला.यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन करताना खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र ही पुरोगामी भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह महान संताच्या वास्तव्याने पुनीत पावन झालेली ही पुरोगामीत्वाची भूमी आहे. मुश्रीफसाहेब पुरोगामीत्वाच्या या परंपरेतीलच तुम्ही आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. तुमच्या या कार्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.यावेळी नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, दुर्दवाने सौभाग्य गमावलेल्या माता-भगिनींचे दुःख आधीच डोंगराएवढे असते. तशातच विधवा माता -भगिनींच्या संबधीच्या अनिष्ठ परंपरा त्यांना जास्तच वेदनादायी ठरत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.