
कागल:गोरगरीबांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार असल्याचे भावनिक उदगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये निराधारांना पेन्शन वाटप, विद्यार्थ्यांना दाखले वाटप व लहान मुलांच्या आरोग्य मोहिमेचा प्रारंभ अश्या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. संजय गांधी निराधार योजनेच्या ४०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप व आरोग्यसेवा योजनेचा प्रारंभ झाला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एक दिवसापासून १८ वर्षापर्यंतच्या लहान मुलांसाठी ही मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार मोहीम राबविली जाणार आहे. लहान गावांमध्ये संपूर्ण एक दिवस व मोठ्या गावांमध्ये दोन दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मेंदूचे आजार, दुभंगलेले ओठ व टाळू, हाडांचे आजार, डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू व तिरळेपणा, ऐकू न येणे, हृदयशस्त्रक्रिया, दात किडणे व काढणे या आजारासंबंधित तपासण्या, शस्त्रक्रिया व उपचारही मोफत केले जाणार आहेत.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जागतिक पातळीवर महिलांच्या गर्भाचे आणि स्तनांच्या कॅन्सरवरील लसीचे संशोधन झाले आहे. लग्नापुर्वी नऊ वर्ष आधी ही लस दिल्यास महिलांना गर्भाचे आणि स्तनांचे कॅन्सर होणार नाहीत, असे या अभ्यासातून पुढे आले आहे. या लसीच्या एका डोसची किंमत साडेसात हजार रुपये आहे. या लस पुरवठ्यासाठीही सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिला टप्पा निम्म्यावर पोहोचल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कॅन्सर तपासणीही मोफत केली जाणार आहे.
मुलांच्या आरोग्य मोहिमेचा प्रारंभ