
कागल : शिक्षकांनो……, तुम्ही अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये आणणारच आहात. सोबतच त्यांना जागरूक नागरिकही घडवा, असे आवाहन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. शिक्षक हे राष्ट्रनिर्माता आहेत, असे गौरवउद्गारही त्यांनी काढले.
कागलमध्ये आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार श्री. मुश्रीफसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रा. जयंत आसगावकर होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफसाहेब पुढे म्हणाले, गुणवत्त विद्यार्थी तर घडवाच. सोबतच एक सुजाण आणि सजग भारतीय नागरिक बनवण्याची फार मोठी जबाबदारीही तुमच्यावर आहे. मेरिटच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचे धडेही त्याला कळत न कळत द्या. शालेय पुस्तकातील धडे, कविता आणि गणितांबरोबरच आयुष्याची गणितेही मांडायला शिकवा व ती सोडवण्याइतपत त्याला सक्षम बनवा.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन हे नेहमीच विधायक सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असते. या पुरस्कारांमुळे चांगले काम करणाऱ्यांची ताकद निश्चितच वाढेल. जिल्हा परिषदांच्या शाळांमधूनही दर्जेदार आणि गुणवत्त शिक्षण दिले जाते याची ही प्रचिती आहे. सरकारी शाळांमधून तयार झालेले विद्यार्थीही तितक्याच क्षमतेने आपापल्या क्षेत्रात नेटाने काम करीत आहेत.
शिक्षकनेते दादासाहेब लाड म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या या पुरस्कारामुळे चांगलं काम करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल. चिखल – मातीचा गोळा असलेल्या विद्यार्थ्याला सुबक आकार देण्याचे काम शिक्षक करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आई-वडिलांसोबतच शिक्षकाची प्रतिमाही आदर्श असते, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, शिक्षकांना मिळालेल्या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घ्यावी ही अपेक्षा आहे. तसेच देशाचे भवितव्य उज्वल करण्याचे काम शिक्षकांच्या हातून व्हावे, ही समाजाची अपेक्षा आहे. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी शाळा परिसर सुधारणेला आणि शैक्षणिक उठावाला सातत्याने चालना दिली आहे.स्वागत शंकरराव संकपाळ यांनी केले. प्रास्ताविक कोजिमाशिचे संचालक राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.