
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे अभ्यास शिबिर
कोल्हापूर : काँग्रेस पक्षाच्यावतीने शिर्डी येथे ४ आणि ५ नोव्हेंबरला राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार मार्गदर्शन करणार आहेत. चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून केले जातात. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत. तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, पत्रकार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी मोहीम गतिमान करण्यात येणार असून शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला चालना देण्यात येणार असल्याचे आ. हसन मुश्रीफ यांनी सांगितले.