
कोल्हापूर/ प्रतिनिधी : १३५० वर्षापेक्षा अधिक आध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्य्यावातीने २० ते २६ फेब्रुवारी २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील *‘सुमंगलम’* या पृथ्वी, पाणी,हवा, तेज,आकाश अशा पंचमहाभूतांच्यावर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणत: ५०० एकर मध्ये होणाऱ्या या उत्सवाला जगभरातून विविध मान्यवर व सुमारे ३० लाख लोकांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचे परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे स्वरूप असणार आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या बोध चिन्हाचे अनावरण पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी व विविध मान्यवरांच्या उपस्थित *शुक्रवार दिनांक २५/११/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता पंचगंगा घाट येथे होणार आहे.* यावेळी पर्यावरणाला पूरक अशा हजारो गोमय पणती प्रज्वलित करून या भव्य उत्सवाच्या तयारीची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. यावेळी पंचमहाभूत तत्वांशी संबंधित सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन व उत्साचे थीम सॉंगचे अनावरण करण्यात येणार आहे . सदर अनावरण सोहळा जगभरामध्ये फेसबुक लाईव्हच्या (श्रीक्षेत्रसिद्धगिरी मठ- facebook.com/siddhgiri.kolhapur) माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. या उत्सवाच्या बोध चिन्हाची निर्मिती स्वच्छता अभियान लोगोचे निर्माते अनंत खासबागदार व शिरीष खांडेकर यांनी केली आहे. तरी कोल्हापूरकरांनी या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमात सहभाग नोंदवून पंचगंगा घाटावरील पर्यावरण पूरक आणि भारतीय संस्कृतीला साजेशा अशा सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी शंकर पाटील, डॉ.संदीप पाटील, माणिक पाटील चुयेकर, डॉ. रवींद्र सिंग, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील यांच्यासह विविध मुद्रित प्रसारमाध्यम व वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.