
कोल्हापूर:पर्यटन, उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी कोल्हापुरातील विमानतळाचे झपाट्याने विस्तारीकरण करण्यात आले आहे. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारतीचा उद्घाटन सोहळा, रविवार 10 मार्च रोजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला कोल्हापूरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजर राहावे आणि कोल्हापूरच्या विकासाच्या वाटचालीतील एका महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार बनावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. गेली काही वर्षे सातत्याने खासदार महाडिक कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण आणि हवाई सेवा विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याला यश आले असून, कोल्हापूर विमानतळावरून रोज सहा विमाने ये जा करतात. कोल्हापूर विमानतळासाठी अत्यंत देखणी नवी टर्मिनल इमारत बांधण्यात आली आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा लुक या नव्या इमारतीला देण्यात आला आहे. शिवाय अनेक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांच्या तैलचित्रांचा विमानतळाच्या इमारतीमध्ये मोठ्या खुबीने वापर केला आहे. अत्यंत आधुनिक सेवा सुविधा देणाऱ्या या विमानतळाच्या नव्या इमारतीचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूर विमानतळावर टर्मिनल बिल्डिंग उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात होणार असून, या कार्यक्रमाला कोल्हापूरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे.