
वारसा नको… विकासावर बोलु या
: खा. मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण
कोल्हापूर :
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक एकोप्याचे विचार, त्यांनी केलेली विकास कामे… आणि त्याचा आपल्याला लाभलेला वारसा याबाबत बोलण्यापेक्षा राजर्षीच्या गादीचा मान राखून आपण कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने काय पावले उचलली, याचा लेखाजोखा लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर आता मांडण्याची वेळ आली आहे . तेव्हा सातत्याने प्रवक्त्या आडून वारसा न सांगता समोर या. जाहीरपणे कोल्हापूरचा विकास यावर थेट चर्चा करु,अशा शब्दात खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना चर्चेचे जाहिर निमंत्रण दिले आहे.
शनिवार दि. 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरात जाहीर सभा होणार आहे. त्या अनुषंगाने महायुतीच्या वतीने आज कोल्हापुरात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर खास. मंडलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खा. मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोचवायला आम्ही कटीबद्ध आणि समर्थ आहोत. राजर्षी शाहू महाराज ही आमची देखील अस्मिता आहे . ती आम्ही जपूच. पण अस्मिता जपताना आपल्या कर्तव्यात कुठे कसूर होणार नाही याचं भानही प्रतिस्पर्धी उमेदवारानं राखलं पाहिजे;पण नुसत्याच वारसा हक्कावर दावा केला जातो आहे. आपल्या 50 वर्षातील कामाचा लेखाजोखा काही मांडला जात नाही. गादीच्या अपमानाचा कांगावा केला जात आहे. पण प्रत्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी गादीचा लौकिक वाढावा , राजर्षी शाहुंचा कृतीशील वारसा जपावा यासाठी काय केलं…? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी केलेला विकास आणि सुधारणा विसरता येत नाहीत. मात्र त्यांच्या कामाचे श्रेय न घेता आपण कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले हे सांगावे. निवडणुकीच्या निमित्ताने ते विचारण्याची वेळ आली आहे. तेव्हा उमेदवार असलेल्या शाहू महाराजांनी समोरासमोर यावे. गेल्या ५० वर्षात काँग्रेसचे उमेदवार शाहु महाराज छत्रपती यांनी विविध क्षेत्रात काय केले आणि खासदार म्हणून आपण केलेले काम याबाबत खुली चर्चा करुया .
यावेळी पत्रकार परिषदेस पालकमंत्री हसन मुश्रीफ,खास. धनंजय महाडिक ,खास. धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, समरजीत घाटगे ,के. पी. पाटील आदी उपस्थित होते.
– चौकट –
प्रवक्त्यांपेक्षा उमेदवारानं बोलावं; हुकूमशाही थाटाचे वर्तन!
लोकशाहीत आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्याची मुभा सर्वांनाच आहे; मात्र उमेदवाराने सातत्याने भूतकाळातल्या आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेऊन जनतेची दिशाभूल करू नये. याचे भान निवडणुकांचा प्रचंड अनुभव असणाऱ्या त्यांच्या प्रवक्त्यांनीही ठेवावे. प्रवक्त्यांनी बोलण्या पेक्षा स्वतः उमेदवाराने आपण आखलेल्या भविष्यातल्या विकास योजनांबाबत बोलावे.
एकंदरीतच प्रवक्त्यांचा या निवडणुकीतील उत्साह पाहता शाहू महाराज छत्रपती यांच्यावर उमेदवारी लादली गेली असल्याचे स्पष्ट होते. तब्बल 25 वर्षे याच मातीत असलेला पैलवान अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्यांना हे लक्षात येत नाही, की निवडणुकीला उभ्या असणाऱ्या उमेदवाराने प्रचारावेळी आपल्या विकासाच्या अजेंडा बाबत बोलणे किती महत्त्वाचे असते. आपण सांगू त्याच पद्धतीने प्रत्येकाने वागावे, अशा हुकूमशाही थाटात प्रवक्ते वावरत आहेत.
फोटो –
पत्रकार परिषदेत बोलताना खास. संजय मंडलिक