
कोल्हापूर : यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संस्कार भारती कोल्हापूर महानगर व म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापुरच्यावतीने शुक्रवारी येत्या ४ फेब्रुवारी रोजी आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी चार वाजता संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजादी-७५, ‘एक शाम शहीदों के नाम’ या विशेष देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. देशभक्तीपर या कार्यक्रमात जवळपास २५ कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच चित्रपट गीताबरोबर संस्कृत वंदे मातरम्, साधना के देश में, भारत हमारी माँ है, अशा काही नाविन्यपूर्ण वेगळ्या धाटणीच्या गीतांचा या कार्यक्रमांमध्ये समावेश आहे. म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या वतीने या कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले महाराष्ट्रातदेखील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. रँडचा वध व जॅक्सनचा वध या दोन घटनांनी स्वातंत्र्य लढ्याला बळ प्राप्त झाले. या घटना यशस्वी करणारे तीनही चापेकर बंधू, महादेव रानडे, अनंत कान्हेरे, केशव कर्वे, विनायक देशपांडे इत्यादी क्रांतिकारक होते यामागची त्यांची योजना, समर्पणाची केलेली तयारी व त्याची पार्श्वभूमी ‘द प्लॅन’ या मधून प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांतच्या वतीने हे दीर्घांक सादर केले जाणार आहे. अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेला चंद्रशेखर फडणीस, लक्ष्मीदास जोशी, सतीश आंबर्डेकर, योगेश प्रभुदेसाई, महेश सोनुले, इंद्रजीत जोशी, महेश कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नाममात्र १००/- एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. सदर प्रवेशिका केशवराव भोसले नाट्यगृह येथे उपलब्ध आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.