
निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय बदनामीचे षडयंत्र : श्री.राजेश क्षीरसागर
जयप्रभा स्टुडीओची जागा शासन ताब्यात येण्यासाठी पाठपुरावा करणार
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा या स्टुडीओची जागा भारतरत्न कै.लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. या स्टुडीओतील निम्मी जागा त्यांनी काही वर्षांपूर्वी विकली असून, उर्वरित जागा श्री महालक्ष्मी स्टुडीओज एल.एल.पी. या फर्मने कायदेशीररित्या खरेदी केली आहे. सदर जागेमध्ये माझ्या मुलांनी गुंतवणूक केल्याबाबत आपण अज्ञभित होतो. परंतु, या फर्मच्या सर्वच भागीदाराशी संवाद साधून सदर जागेशी जनभावना जोडल्या गेल्या असून या जागेतील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी पर्यायी जागा स्वीकारून स्टुडीओची जागा शासनाच्या ताब्यात देण्यास सहमती द्यावी, अशा सूचना दिल्या असून, तात्काळ नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांकडे हि जागा शासनाने ताब्यात घेवून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे संवर्धन आणि स्मारक विकासासाठी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. या जागेच्या खरेदी व्यवहाराबाबत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामीचे षडयंत्र आखण्यात आले असून, जयप्रभा स्टुडीओ बाबत जनभावना लक्षात घेवून या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे आणि कै.लता मंगेशकर यांचे स्मारक उभे रहावे, यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, माझे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर हे सिव्हील इंजिनीअर असून, राज्य घटनेप्रमाणे खाजगी जागा विकत घेण्याचे त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी भागीदार फर्मच्या माध्यमातून खरेदीचा व्यवहार केला आहे. परंतु, सदर जागा मी विकत घेवून दिली असा, चुकीचा गैरसमज निर्माण केला जात आहे. जयप्रभा स्टुडीओच्या खरेदी व्यवहाराशी आपला काडीमात्र संबध नाही.
वास्तविक पाहता सदर भागीदारी फर्म मधील काही भागीदारांचे कै.लता मंगेशकर यांच्याशी गेली अनेक वर्षे व्यावसायिक संबध आहेत. सदर जागेबाबत त्यांनी १० वर्षापूर्वीच करार केला होता. संपूर्ण कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा खरेदी व्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये पुरातन वास्तुना कोणताही धोका न पोहचता संगीत, कला, नाट्य क्षेत्राच्या दृष्टीने विकसित करण्याचे श्री महालक्ष्मी स्टुडीओज या भागीदारी संस्थेचा उद्देश होता. परंतु, जयप्रभा स्टुडीओ विकला, तो पाडला जाणार असा अपप्रचार केला जात आहे. २०१९ च्या निवडणुकीतही अशाच पद्धतीने चुकीचा अपप्रचार करून आपली राजकीय बदनामी करण्यात आली होती. तशीच राजकीय बदनामी आजही केली जात आहे. बेकायदेशीर गोष्टीस आपण पाठीशी घालणार घालत नाही. जर व्यवहार बेकायदेशीर असता तर सर्वच प्रसिद्धीमाध्यमातून याबद्दल वृत्त प्रसिद्ध झाले असते. परंतु, ठराविक वर्तमान पत्राद्वारे जनतेत गैरसमज पसरविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. सदर जागेचा समावेश कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने हेरीटेज वास्तू मध्ये केल्याने या जागेत व्यावसायिक बांधकाम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे जयप्रभा स्टुडीओचे अस्तित्व मिटविण्याचा किंवा नष्ट करण्याचा, जनभावना दुखावण्याचा कोणताही उद्देश यामध्ये न्हवता.
स्वरसम्राज्ञी कै.लता मंगेशकर यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. कै.लता दीदींचे स्मारक व्हावे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, अशी आपलीही इच्छा आहे. पालकमंत्री नाम.सतेज पाटील यांनी कै.लता दीदींच्या स्मारकाबाबत केलेल्या मागणीस माझा पाठींबा आहे. या स्मारकास जास्तीत -जास्त निधी देवून स्मारक पूर्ण करावे, अशी माझीही भावना आहे.
त्यामुळे तातडीने आज श्री महालक्ष्मी स्टुडीओजच्या सर्व भागीदारांशी चर्चा करण्यात आली. सदर विषयाशी निगडीत अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समिती, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, या स्टुडीओच्या जागेऐवजी नियमाप्रमाणे पर्यायी जागा स्वीकारून सदर जागा कोल्हापूर महानगरपालिकेस हस्तांतरित करावी, अशा सूचना श्री महालक्ष्मी स्टुडीओज भागीदारी संस्थेच्या भागीदारांना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर सदर जागेस नियमाप्रमाणे पर्यायी जागा नगरविकास विभागाने देवून जयप्रभा स्टुडीओची जागा कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी ईमेल द्वारे नगरविकासमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे. तसेच श्री महालक्ष्मी स्टुडीओजचे सहमती पत्रही कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरवासीयांच्या भावनांचा मला आदर आहे. टोल, एल.बी.टी, थेट पाईपलाईन या प्रश्नासह शहराच्या विकासात मी अग्रभागी आहे. या संवेदनशील विषयाबाबत मा.नगरविकास मंत्री महोदयांशी चर्चा करून नियमाप्रमाणे पर्यायी जागा देवून स्टुडीओची जागा ताब्यात घेण्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे यास करवीर नगरीतील सर्वच नागरिक सहमत असतील, अशी आशा बाळगतो. कै.लता दीदींच्या स्मारकासाठी आणि स्टुडीओतील पुरातन वास्तूंच्या संवर्धनाच्या करवीरवासीयांच्या मागणीस माझा पाठींबा असून, त्याच्या पूर्णत्वासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाहीही श्री.राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना दिली.