
इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूर(केएमए)च्या वतीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
कोल्हापूर/प्रतिनिधी:शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूर मेडिकल असोसिएशनकडून गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना केएमएच्या हॉलमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
गानसरस्वती, मल्लिका- ये- तरन्नुम अशा विविध मान्यवरांनी गौरवलेल्या सर्वांच्या लाडक्या लतादीदींच्या जाण्याने संपूर्ण विश्वात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणे केवळ अशक्य आहे. सुख-दुःखात प्रेमात, सर्व प्रसंगी त्यांचे सूर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून राहिले आहेत. आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या ‘फ्लॅश’ या नियतकालिकात मागील महिन्याच्या मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र व आतील भागात त्यांचा जीवनपटाचे वर्णन आहे. त्यामध्ये त्यांच्या गमनाची तारीख लिहिण्याची वेळ आली नाही कारण आमच्या आठवणी त्या सदैव अस्तित्वात राहतील. या अनुभूतीकरिता या पुढच्या येणाऱ्या ‘डॉक्टर्स डे’ हा गीतसंगीत कार्यक्रम हा त्यांना समर्पित करणार आहोत. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर जयप्रभा स्टुडिओच्या सानिध्यात अनेक वर्षापासून असल्याने आम्ही त्यांच्याशी बांधले गेलो आहोत.असे उद्गार मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.आशा जाधव यांनी काढले. असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, डॉ. अमर अडके, डॉ. अरुण धुमाळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. प्रिया शहा यांनी लतादीदींना स्वरातून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी डॉ. विजय जाफफळेकर, डॉ.अश्विनी पाटील यांच्यासह तज्ञ डॉक्टर,सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.