
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूरच्या महिलांबद्दल अपमानास्पद शब्द काढणाऱ्या नेत्यांनी कोल्हापूरची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले आहे. या विरोधात सर्व महिला पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत असे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपचेच लोक सतत महिलांचा अपमान करत असतात. चित्रा वाघ यांनी महिलांचा अपमानाबद्दल ट्वीट केले परंतु ते नंतर डिलीट करण्यात आले. पराभव दिसल्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. भाजपच्या नेत्यांना डबल सुरक्षा देण्याची आवश्यकता वाटत आहे. महिलांबद्दल अपमानास्पद शब्द काढून राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूर शहराची तसेच जिल्ह्याची बदनामी करणे हे संयुक्तिक नाही. कोल्हापुर असुरक्षित आहे अशी कोल्हापूरची प्रतिमा देशात जाणे बरोबर नाही. यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या प्रगतीला हो घातला जाईल.
महादेवराव महाडिक आत्ता सध्या सक्रिय नसल्याने चंद्रकांतदादा त्याची उणीव भरून काढत आहेत. पैसे देऊन मतदार मतदान करतात हे दादांनी केलेले वक्तव्य देखील मतदारांचा अपमान करते. तीन लाख मतदारांचा तुम्ही अपमान केला आहे. कोल्हापूरची जनता कधीही पैसे घेऊन मतदान करत नाही. मतदारांवरच आता ईडी लावण्याची वेळ आली आहे हे त्यांचे वक्तव्य म्हणजे ईडी ही तुम्ही चालवलेली संस्था आहे हे आता स्वतः दादांनी सिद्ध केले. असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला. कोणी कोणाचे पैसे द्यायचे असल्यास या आठ दिवसात मला ऑनलाईन देऊ नका नाहीतर माझ्यावर ईडी लागेल असे लोक एकमेकांना म्हणत आहेत. हा आता एक चेष्टेचा विषय बनलेला आहे असेही ते म्हणाले.
भाजपची प्रत्येक सभा लाईव्ह होते. फक्त चित्रा वाघ यांच्यावर दगडफेक झाली ही सभा मात्र लाईव्ह केली नाही. याचे उत्तर देखील भाजपने द्यावे. या सर्व गोष्टींचा तपास करावा असेही या परिपत्रकात म्हटले आहे.