
कोल्हापूर: उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय हिंदु महासभेने आज राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे झेंडे प्रदान करून हा पाठिंबा देण्यात आला. हिंदू महासभेचे प्रांत अध्यक्ष निरंजन दीक्षित, राष्ट्रीय उपाध्यक्षा आरती दीक्षित, जिल्हाध्यक्ष संदीप सासणे यांनी इथून पुढे आमचे सर्व प्रकारे विकास आघाडीला सहकार्य असेल अशी ग्वाही दिली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भाजपवर टीका केली. भाजपला हिंदूंचे बेगडी प्रेम आहे. हिंदू म्हणजे काय हे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले. ज्याचे देशावर प्रेम व निष्ठा त्या व्यक्तीला आम्ही हिंदू मानतो. पण भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात फूट पाडून राजकारण व सत्तेसाठी त्याचा फायदा करून घेत आहे.बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली. त्यावेळेला भाजप आणि शिवसेना एकत्र होते. पण ज्यावेळेला शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले तेव्हा भाजप मागे फिरले. हिंदु महासभेने हा योग्य निर्णय घेतलेला आहे. हिंदू महासभेचे कार्य ‘हिंदू हेच राष्ट्रीयत्व’ ह्या ब्रीदवाक्य नुसार तसेच सावरकरांच्या आचार विचारानुसार चालते. सावरकरांचे देशाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांचा आम्ही सन्मान करतो. ही सर्वश्रेष्ठ संघटना आहे. या संघटनेचा पाठिंबा आम्हाला मोलाचा आहे. शिवसेनेने हिंदुत्वाचे रक्षण केले आहे. खऱ्या अर्थाने शिवसेना हीच हिंदूत्ववादी आहे. हिंदुत्व म्हणत पाय ओढणे आम्हाला जमत नाही, असेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.यावेळी लता कदम, हर्षल सुर्वे, जयंत हारुगले, किशोर घाटगे, कमलाकर किलकिले आदी उपस्थित होते.