
कोल्हापूर:कोविड काळात विविध कोविड केअर सेंटर्स, जिल्हा कोविड रुग्णालय, उप-जिल्हा रुग्णालय येथे सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना अद्याप मानधन मिळालेले नाही. सेवा पूर्ण होऊन सात महिने उलटून देखील त्यांचे मानधन थकीत असल्याने आज आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोविडसाठी आलेला निधी परत घेल्याचे कारण पुढे करत वेतन देण्यास टाळाटाळ होत आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करून आरोग्य सेवाकांचे मानधन द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली.मंत्र्यांच्या उपचारासाठी लाखोंची बिले भरण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण कोविडमध्ये जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आरोग्य सेवकांचे मानधन देण्यासाठी पैसे नाहीत का असा सवाल ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी उपस्थित केला.येत्या आठवड्यात निधीची तरतूद होऊन मानधन जमा केले नाही तर आरोग्य राज्यमंत्र्यांच्या घरासमोर 4 मे ला ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा ‘आप’चे जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांनी दिला.यावेळी अश्रफ शेख, डॉ. स्मिता यादव, रुपाली पोवार, उत्तम पाटील, दिलीप पाटील, अमरजा पाटील, शरद पाटील, डॉ. किरण कटके, ज्योती जाधव, शोभा कुंभार, सुरज सुर्वे, अभिजित कांबळे, अभिजित पाटील, मयूर भोसले, बाळासो जाधव, यांच्यासह आरोग्य सेवक उपस्थित होते