
कोल्हापूर: श्री शाहू समाधी स्थळ येथे श्री शाहू महाराज छत्रपती, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती, राहुल पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह संपादक, विविध क्षेत्रातील मान्यवर, शाहू प्रेमी, नागरिक, विद्यार्थी यांनी स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले.
लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूर 100 सेकंद स्तब्ध झाले. जिथे असेल त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी शाहू महाराजांना कोल्हापूरकरांनी मानवंदना दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नलवर एस.टी. बसेस, अन्य वाहने, जाग्यावर थांबवण्यात आली. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी आणि नागरिकांनी उपक्रमात सहभागी होवून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.