
कोल्हापूर : सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने आज महानगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अधिकारी लवकर भेटावयास न आल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांशी झटापट झाली.जानेवारी महिन्यात भारतीय जनता पार्टीने कचरा घोटाळा उघडकीस आणला होता. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचरा विनाप्रक्रिया बावड्यातील अनेक शेतांमध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पंचनामा करून त्यात ही बाब स्पष्ट केली होती. तसेच महानगरपालिकेच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीतही हा गैरप्रकार सिद्ध झाला होता. परंतु सहा महिने उलटून गेल्यानंतरही या घोटाळ्यातील दोषी असलेला कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर अत्यंत जुजबी कारवाई करून प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत भाजपने आज निदर्शने केली.