Home News पत्रकारिता विद्यार्थ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव

पत्रकारिता विद्यार्थ्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव

4 second read
0
0
67

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज ‘कृतज्ञता पर्व’ साजरे झाले. या लोकोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारिता विभागाचे डॉ. शिवाजी जाधव, माहिती अधिकारी वृषाली पाटील, सहायक संचालक फारुक बागवान, डॉ. सुमेधा साळुंखे, माहिती सहायक एकनाथ पोवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

      राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व काळात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवलेल्या उपक्रमांची व कार्यक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, अशी कल्पना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मांडली. त्यानुसार विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी पत्रकारिता विभागाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले. या उपक्रमामध्ये बी. जे., एम. जे., मास कम्युनिकेशन आणि पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम आदी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात नियोजनाच्या काही बैठका झाल्या. या बैठकीला पत्रकारिता विभागातील डॉ. शिवाजी जाधव, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट व जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रसिद्धी टीम’ तयार करुन विविध कार्यक्रमांच्या प्रसिद्धीचे नियोजन करण्यात आले. विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयासोबत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांचे कव्हरेज केले. यासाठी पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव यांचे सहकार्य मिळाले. कृतज्ञता पर्व उपक्रमांतर्गत त्या त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, कार्यक्रम बातम्या, विशेष वृत्त, ऑडिओ -व्हिडिओ वृत्तसंकलन आदी माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे विविध उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

कृतज्ञता पर्व प्रसिद्धी कार्यात विद्यार्थी व पत्रकारिता विभागाचे महत्वपूर्ण सहकार्य मिळाले, असे सांगून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शासकीय जनसंपर्क व प्रसिद्धी व्यवस्थेची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांनी केले.

शासकीय उपक्रमांच्या प्रसिद्धी मोहिमेत पत्रकारिता विभाग व विद्यार्थ्यांचे नेहमीच सहकार्य राहील, असा विश्वास डॉ.शिवाजी जाधव व डॉ. सुमेधा साळुंखे यांनी व्यक्त केला.

‘कृतज्ञता पर्व’ उपक्रमाच्या प्रसिद्धी मोहिमेत सहभागी झाल्यामुळे शासकीय कामकाज व शासकीय प्रसिद्धी व्यवस्थेच्या कामाचा अनुभव मिळाला. यातून खूप काही शिकण्याची संधी मिळाली, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून यशस्वी झाल्याबद्दल श्रुतिका संदीप मोरे हिचा सत्कार डॉ. खराट यांच्या हस्ते करण्यात आला. वृषाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. फारुक बागवान यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सतीश शेंडगे यांनी केले. यावेळी माहिती सहायक एकनाथ पोवार तसेच माहिती विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

छायाचित्र ओळ- माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट व डॉ.शिवाजी जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ.सुमेधा साळुंखे, वृषाली पाटील, फारुक बागवान उपस्थित होते. 

Load More Related Articles
Load More By Angle Media
Load More In News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया 

कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय…