
राजर्षी शाहूंच्या कर्तृत्व आणि विचारांचा वारसा मुश्रीफांनी पुढे चालविला : पालकमंत्री सतेज पाटील
कागलमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या चबूत-याचे भूमिपूजन….
कागल : राजर्षी शाहू महाराजांनी कार्यकर्तृत्वाने सबंध मानवजातीला संपन्न केले. या महामानवाच्या विचार आणि कर्तृत्वाचा वारसा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थपणे पुढे चालविला आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले. मंत्री मुश्रीफांनी गोरगरिबांच्या आयुष्याला गती देऊन त्यांच्या जीवनात समृद्धी व गोडवा निर्माण केला, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री.पाटील कागलमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या
चबुत-याच्या भूमिपूजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कागल नगरपरिषद व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने हा पुतळा उभारला जाणार आहे.
मंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तुत्व आणि विचारांचा वारसा घेऊन मंत्री श्री. मुश्रीफ गेली ३५ वर्ष लोकाभिमुख काम करीत आहेत. जनतेसाठी जे- जे चांगले आहे ते श्री. मुश्रीफ यांनी राज्यभर नेले, असेही ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आजवर देशात अनेक राजे- रजवाडे होऊन गेले. परंतु; रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मानवजातीला समतेचे संदेश देणारे म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पालख्या आपण वाहत आलो आहोत. राजर्षी शाहू महाराजांनी गरीब, वंचित, पीडित व दलितांच्या उत्थानासाठी आरक्षणाचा कायदा केला. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासह मुलींच्या शिक्षणासाठीही ते आग्रही राहिले. तसेच, सर्वच समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधून खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती केली.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याला “राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर जिल्हा” असे नाव द्यावे, अशी आग्रही मागणीही केली.
“माता भगिनींचा सन्मान……”
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनीही विधवा प्रथेला बंदी केली होती. तोच निर्णय मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून घेतला. या निर्णयामुळे राज्यातील माता भगिनींचे आशीर्वाद त्यांना मिळतीलच. तसेच, समाजात सन्मानाने वावरताना या समस्त माता -भगिनींना हसन हसन मुश्रीफ या आपल्या लाडक्या भावाचेही स्मरण होईल.
“वारसदारांचे योगदान नाही…..”
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःचा खजिना रिकामा करून जनतेची सेवा केली. स्वतःच्या खजिन्यातून त्यांनी कोल्हापूरच्या हरितक्रांतीसाठी राधानगरी धरण बांधले. परंतु त्यांचे वारसदार म्हणून गाजावाजा करणारे समरजित घाटगे यांनी मात्र शाहू कारखान्याच्या पैशातून त्यांचा पुतळा उभारला. यामध्ये श्री. घाटगे यांचे एक पैशाचेही अथवा एका गुंठ्याचेही योगदान नाही, असेही ते म्हणाले.