
सत्ता असली काय आणि नसली काय, जनतेची हमाली करीतच राहू
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही………
बामणी येथे सहा कोटीच्या कामांचे लोकार्पण……..
बामणी : सत्तेत असो वा नसो. जनसेवेची माझी हमाली आयुष्यभर सुरूच राहील. जनतेसाठी माझे दरवाजे सदैव उघडे राहतील. अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
बामणी ता.कागल येथे विविध विकासकामांच्या उदघाटनवेळी ते बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांचे सरसेनापती एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अस्थिर झाले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. हे सरकार उर्वरित अडीच वर्षांसाठीही टिकून राहो. अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. सत्ता असो वा नसो हर परिस्थितीत त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत.
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबतच आहोत. राज्यात निर्माण झालेल्या या अस्थिर परिस्थितीची भीती फक्त एवढीच आहे की ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला विशेषता: कागल तालुक्याला मिळत असलेला मोठ्या प्रमाणातील निधी कमी होईल.
*”प्रोत्साहनपर अनुदानापासून शेतकरी वंचित राहणार नाहीत……….”*
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे वचन होते. ते पूर्ण होत आहे. परंतु; पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने या निर्णयात बऱ्याच त्रुटी असल्याचे मला समजले. त्या दुरुस्त करून या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणार नाहीत, यासाठी पाठपुरावा करू, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.
यावेळी मनिषा पाटील, भिकाजी मगदूम, विकी मगदूम, बाबूराव मगदूम, नेताजी बुवा, युवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.