
कागल:कागल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अडीच वर्षात ७० कोटी रुपये निधी आणला. गडहिंग्लज व मुरगूड शहरांच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात निधी आणला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. या तिन्ही शहरांच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी दिल्याबद्दल तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभारही मानले.
श्रीमंत जयसिंगराव पार्कसह श्रमिक वसाहत, आधार कॉलनी व समर्थ कॉलनीतील मिळकतधारकांना सनद आणि प्रॉपर्टी कार्ड वितरण समारंभात ते बोलत होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रभागातील मालमत्ता धारकांची सोसायटी स्थापन होऊन तीस वर्षे झाली तरीही मालमत्ता पत्रके स्वतंत्र निघत नव्हती. त्यामुळे मालमत्ता विक्री, कर्ज, हस्तांतर, तारण यासाठी अडचणी येत होत्या. लवकरच अनंत रोटो स्पिनिंग मिल प्रभागातील नागरिकांनाही स्वतंत्र मालमत्ता पत्रके मिळतील. अतिक्रमित झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणाचेही काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तसेच शाहूनगर बेघर वसाहतीमधील मालमत्ता धारकानाही येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून मालमत्ता पत्रके देण्याचा प्रयत्न करू.
“संपूर्ण महाराष्ट्राला पथदर्शी उपक्रम…..”*
आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, मी नगरविकास मंत्री असताना हा उपक्रम हाती घेतला होता. स्वतंत्र मालमत्ता पत्रके तयार करण्याचा ३६ लाख रुपये खर्च नागरिकांवर पडू नये म्हणून तो शासनाच्या तिजोरीतूनच घातला. कागल शहराशी संलग्न सर्वच वाढीव वसाहतींमधील मालमत्ताधारकांनाही मालकी हक्काची पत्रके मिळणार आहेत. तसेच हा उपक्रम नजरेसमोर ठेवूनच राज्यातील ६३ नगरपालिकांमध्येही असाच उपक्रम राबविला. मालमत्ता धारकांना एक रुपयाही खर्च न येता तब्बल २४ कोटी खर्च राज्य शासनाने करूनच मालमत्ता पत्रके वितरित केली जात आहेत.यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव, तालुका उपाधीक्षक सुवर्णा पाटील, ॲड. संग्राम गुरव यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाला संजीव ठोंबरे, कृष्णात गाडेकर, आप्पासाहेब घाटगे, महावीर हातगिणे, अजित इंगळे, प्रवीण काळबर, दिलीप शिंदे, अशोक पाटील, अमित पिष्टे, महादेव वाडकर, मारुती संकपाळ, सौरभ पाटील, संभाजी भोई आदी प्रमुख उपस्थित होते.