
कोल्हापूर:राज्य सभेतील खासदार धनंजय महाडिक यांनी आज नागरी विमान उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंदीया यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि कोल्हापूर विमानतळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीबाबत सकारात्मक चर्चा केली. कोल्हापूरहून मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर या महत्वाच्या शहरांना नियमित हवाई सेवा सुरू होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून मुंबई आणि बेंगलोरची विमान सेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. ट्रुजेटच्या वतीने कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्यामुळे, तो स्लॉट रिकामा असल्याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. इंडिगो एअरलाईन्स या मार्गावर सेवा देण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना या मार्गासाठी परवानगी देण्याची मागणी महाडिक यांनी केली. त्याला सिंदीया यांनी ताबडतोब मान्यता दिली.
सध्या कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावरही रोज विमानसेवा सुरू करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. विशेषत: अहमदाबाद विमानसेवेसाठी व्यापारी वर्गाची आग्रही मागणी असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. त्याचबरोबर अलायन्स एअरची कोल्हापूर – बेंगलोर विमान सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी, या कंपनीला सूचना कराव्यात, अशी महाडिक यांनी मागणी केली. नाईट लँडींग करण्यासाठी कोल्हापूर विमानतळ तांत्रीकदृष्टया सज्ज आहे. केंद्रीय समितीने कोल्हापूर विमानतळाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे नाईट लँडींग परवाना ताबडतोब द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १३७० मीटर वरून १९३० मीटर पर्यंत वाढवण्यात आली आहे