
कोल्हापूर : राज्यात जनावरांमध्ये वेगाने पसरत चाललेल्या लम्पी स्किन आजारासंदर्भात प्रशासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या. या रोगाबाबत पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या आजारावर मात करण्यासाठी तात्काळ जिल्हातील सर्व गाईंचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी पशुसंवर्धन उप-आयुक्त डॉ.पठाण यांना दिल्या. लम्पी स्किन आजारासंदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पशुसंवर्धन अधिकारी आणि कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुधविक्रेते असोसिएशनची आढावा बैठक पार पडली.राजेश क्षीरसागर यांनी, या आजाराने बाधित झालेल्या गाईंची संख्या, त्यातून बरी झालेली जनावरे आणि सध्या उपचार सुरु असणारी जनावरांची माहिती घेतली. यासह या आजाराची लक्षणे गाई व्यतिरिक्त अन्य पाळीव प्राण्यामध्ये दिसून आली आहेत का? अन्य प्राणी बाधित झाले आहेत का? याचा आढावा घेतला.याबाबत माहिती देताना पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ.पठाण यांनी, जिल्ह्यात सध्या ६२ गाई या आजाराने ग्रस्त झाल्या होत्या. त्यातील २२ गाई बऱ्या झाल्या असून उर्वरित ४० गाईवर उपचार सुरु असल्याचे सांगितले. सदर गाईना स्वतंत्र विलगीकरणकरून ठेवण्यात आले आहे. या आजाराच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात एकही जनावराचा मृत्यु झाला नसल्याचे सांगितले. यासह हा आजार फक्त गाईमध्ये पसरला असून, यापासून अन्य कोणतेही जनावर बाधित झालेले नसल्याचे सांगितले. यासह शासकीय मदतीसाठी टोल फ्री नंबर १९६२ व १८००२३३०४१८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.