
कोल्हापूर : प्रतिबंध हाच लम्पी रोखण्याचा उपाय आहे यासाठी कोरोनाच्या धर्तीवर लम्पीला हाताळण्याची गरज असल्याचे इंडियन डेअरी असोसिएशन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.देशात आणि राज्यात दिवसेंदिवस लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक जनावरांना या रोगाची लागण होत आहे. यामध्ये काही जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. शासकीय आणि संस्थात्मक पातळीवर यंत्रणा सतर्क आहे. तरीही वेळीच याचे गांभीर्य ओळखून पंचसुत्रीची अंमलबजावणी केली पहिजे. इंडियन डेअरी असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्या सह इतर राज्यांचा दौरा करून दूध संस्था आणि दूध उत्पादकांशी संवाद साधून प्रतिबंधात्मक उपायासाठीची पंचसूत्री आणि शासकीय स्तरावरील मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लम्पिचा प्रसार रोखण्यासाठी पुढील पंचसूत्रीचा वापर करावा लागेल
१) रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे यासाठी योग्य पद्धतीने वैरण आणि पाणी व्यवस्थापन या सोबत कमतरता असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पशु खाद्य आणि मिनरल मिक्श्चर यांचा योग्य प्रमाणात वापर. गोठ्याचे तापमान कमी ठेवणे.
२) रोगाचा प्रसार थांबवणे यासाठी गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवणे तसेच कोरडा ठेवणे, रोगाच्या प्रसारास प्रमुख कारणीभूत असणाऱ्या डास,गोचीड इतर कीटक यांचे निर्मुलन करणे त्यासाठी औषध फवारणी करणे. त्यांच्या वाढीस प्रतिबंध करणे. याशिवाय जनावरांची मुक्त चराई बंद करणे.
३) १००% लसीकरण करणे आणि यासाठी एका जनावरासाठी एका सुईचा वापर करणे.
४) जनावरामध्ये लक्षणे आढळताच तातडीने जनावराला विलगीकरणात ठेवणे.
५) लक्षणे आढळताच आरोग्य यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून औषधोपचार सुरु करणे.
यासोबत प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरने अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सरपंच,ग्रामसेवक,पोलीस पाटील, आरोग्य विभाग आणि प्रमुखांची एक स्थानिक समिती स्थापन करून गावातील सर्व गोठ्यातील जनावरे त्यांचे आरोग्य याचे निरीक्षण आणि नोंदी ठेवून हालचालीवर लक्ष ठेवता येईल आणि लक्षणे आढळताच तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल. विलगीकरणासाठी गावाबाहेर सामुहिक व्यवस्था करता येईल. ज्या भागात गोठे आहेत अशा शहरी प्रभागात देखील स्थानिक नगरसेवक, प्रशासन, आरोग्य विभाग आणि प्रमुख लोकांची समिती स्थापन करता येईल आणि उपाययोजना करता येतील. यामुळे ऊसतोड आणि इतर कामासाठी बाहेरून येणाऱ्या पशुधनाची नोंद ठेवणे शक्य होणार आहे.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी शासकीय स्तरावर केलेल्या उपाययोजना आणि नियोजनाची माहिती दिली. प्रत्येक तालुक्यात दूध संघ आणि शासनाच्या वतीने तालुका आणि विभागवार पथके निर्माण केली आहेत. त्या माध्यमातून पूर्णपणे मोफत लसीकरण, औषधोपचार दूध उत्पादकाच्या गोठ्यापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी यंत्रणा प्रभावीपणे कार्य करत आहे. मृत जनावरांसाठी तीस हजार रुपयांची शासकीय मदत शासनाच्या वतीने दिली जात आहे. यासाठी लम्पिची लक्षणे दिसताच शासकीय यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.