
कोल्हापूर: भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला काँग्रेसचा मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्याची संकल्पना आमदार सतेज पाटील यांची होती.
उद्यापासून 100 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात 13 एलईडी व्हॅनच्या माध्यमातून 1239 गावांमध्ये भारत जोडो यात्रेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी व्हॅनच्या चाव्या दिग्विजय सिंह यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी पायी चालत एवढी मोठी यात्रा काढतील यावर कुणाचा विश्वास नव्हता, आतापर्यंत त्यांना बदनाम केले गेले, त्याच राहुल गांधींनी एका महिन्यात आपली चांगली आणि खरी प्रतिमा देशभर पोहोचवल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले. सनातन धर्मात जगाचे कल्याण होवो असे असताना त्या सनातन धर्माला का बदनाम करता? का हिंदू मुस्लिम विभागणी करत आहात? असा सवालही त्यांनी केला.
दिग्विजय सिंह यांनी आपल्या भाषणातून यात्रेचा उद्देश समजावून सांगितला. तसेच भाजपकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेला केवळ एक महिना झाला असताना मोहन भागवत मशिद, मदरसात जाऊ लागले आहेत. तत्पूर्वी, आमदार सतेज पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना भाजपवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या यात्रेची जगभरात घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सतेज पाटील यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेचे कौतुकही केले.यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी मोदी सरकार जनतेच्या मनात, देशात अशांतता निर्माण केले जात आहे, हे वातावरण बदलण्यासाठी आणि देश पुन्हा एकसंध ठेवण्यासाठी ही यात्रा सुरु असल्याचे ते म्हणाले.