
गोरगरीब कार्यकर्त्यांना आयुष्यभर जीवापाड जपलं; माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे प्रतिपादन; करड्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने
करड्याळ : संपूर्ण आयुष्यभर परोपकारी वृत्तीने कार्यरत राहिलो. गोरगरीब कार्यकर्त्यांना जीवापाड जपलं. ज्यांनी- ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्याना कधीही फसवलं नाही, असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
करड्याळ ता. कागल येथे साडेचार कोटी रुपये निधीच्या विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात श्री. घाटगे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसनसाहेब मुश्रीफ उपस्थित होते.
आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, मी आणि संजयबाबा घाटगे सातत्याने तीस वर्षे एकमेकांशी संघर्ष करीत राहिलो. एका ऐतिहासिक वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. संजयबाबांसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवूच. अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात हजारो कोटींचा निधी मतदारसंघात आणला. परंतु; सत्ताबदलानंतर बिळातून बाहेर पडलेले काहीजण सगळं काही मीच केलं अशा वल्गना करीत फिरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत म्हणाले, जनतेच्या कल्याणकारी विचारातूनच आमदार हसनसाहेब मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे ही मित्रांची जोडी एकत्र आली आहे. या युतीला दृष्ट लागू देऊ नका.
“आयुष्यभर लढत राहिलो…..”
संजयबाबा घाटगे म्हणाले, मी आणि हसनसाहेब मुश्रीफ आम्ही दोघांनीही तरुणपणातच स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांचा विचार रुजवण्यासाठी आयुष्यभर लढत राहिलो. परंतु; काहीजणांना ते रुचत नव्हते. त्यांनी काड्या घालण्याचेच काम केले.
व्यासपीठावर दिग्विजयसिंह उर्फ भैया पाटील, सरपंच विठ्ठल टिपुगडे, उपसरपंच सुरेश गेंगे, शामराव पाटील, दाजीबा कुंभार, शशिकांत पाटील, युवराज आडसूळ, आनंदा कुंभार, पांडुरंग बिरंजे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत ॲड. अरुण पाटील यांनी केले. प्रास्ताविक जीवन फेगडे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले.
करड्याळ ता. कागल येथे प्राथमिक शाळेसाठी बांधलेल्या पाच शाळा खोल्यांचे उद्घाटन करताना आमदार हससाहेब मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावेळी शशिकांत खोत, सरपंच विठ्ठल टिपुगडे, ॲड. अरुण पाटील व इतर प्रमुख.