
कोल्हापूर : ब्रँड कोल्हापूर सन्मान सोहळ्याच्या चौथ्या वर्षीचा कार्यक्रम आज कोल्हापूरचे सुपुत्र व बेंगलोरचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार अनाथ आणि वंचितांसाठी आयुष्यभर झटणारे डॉ. सुनील कुमार लवटे, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हेमंत निंबाळकर यांच्या अस्सल कोल्हापुरी भाषेतील भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली. सर्वांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. कोल्हापूर नगरीने देशाला आणि जगाला असंख्य कलाकार, तंत्रज्ञ, अभियंते, खेळाडू दिले आहेत. मात्र कामाबद्दल फारशी कोणाला माहिती नसते. आज त्यांचा सन्मान होत आहे. या समाजाच्या सर्व क्षेत्रातील यशस्वी लोक आहेत. हे अत्यंत आश्वासक गोष्ट आहे. ब्रँड कोल्हापूर यामुळे यशस्वी लोकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे, असे देखील त्यांनी उद्गार काढले.
आजचा जमाना मार्केटिंगचा असून कोल्हापूरचा ब्रँड हा जागतिक पातळीवर गेला पाहिजे. कारण आता कोल्हापूर हे ग्लोबल शहर आहे. कोरोना आणि महापुराच्या संकटाच्या काळात कोल्हापूरने स्वतःला सावरले. कोल्हापूरकरांचा खरा ब्रँड कोल्हापूर असून या घटनांमुळे जे रिव्हर्स मायग्रेशन झाले आहे, त्याचा वापर करून कोल्हापूरची 360 डिग्री मध्ये विकास केला पाहिजे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी मांडले. यावेळी कोल्हापुरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.