
कोल्हापूर : पश्चिम भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी संयुक्तरीत्या शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवलला शुक्रवार 20 रोजी पासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आलेल्या दूध परिषदेचे सकाळी साडेअकरा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इंडियन डेअरी फेस्टिवलचे निमंत्रक गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिली आहे.
कोल्हापूर मध्ये प्रथमच गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्या पुढाकारातून 20 ते 22 जानेवारी दरम्यान इंडियन डेअरी फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. अर्थव्यवस्था, रोजगार, स्वयंरोजगार आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात डेअरी क्षेत्राचे योगदान वाढवण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील संधी, आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान याचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच यातील संधी आणि आव्हाने यावर चर्चा करून 2030 पर्यंतची दिशा आणि ध्येय धोरणे निश्चित करण्याच्या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे.
शुक्रवार 20 रोजी विक्टोरिया हॉल हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेच्या उद्घाटनाने इंडियन डेअरी फेस्टिवल ला सुरुवात होईल. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रमुख मार्गदर्शन करतील. यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिवसभर चालणाऱ्या दूध परिषदेच्या पहिल्या सत्रास सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. यामध्ये दुग्ध व्यवसायातील बदलती परिस्थिती या विषयावर सहकार आणि पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, प्रभात डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मित्रा,NDDB इनोव्हेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेलचे टीम लीडर निरंजन कराडे गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
संध्याकाळी ४ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी पाच वाजता दूध परिषदेचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हसन मुश्रीफ, राजेश टोपे, सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार रोहित पवार, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार ऋतुराज पाटील आमदार राजू आवळे राजेश पाटील आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित असणार आहेत.
20 ते 22 दरम्यान शाहूपुरी जिमखाना येथे इंडियन डेअरी फेस्टिवलचे प्रदर्शन होणार आहे . येथे दुग्ध व्यवसायातील देशभरातील 100हून अधिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी दूध व्यवसायिक यांना दुग्ध व्यवसायातील होत असलेली बदल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.