
कोल्हापूर : आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाला सुरवात करण्यात आली असून कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालय आणि कमला कॉलेज येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण नियोजनाबाबतचा पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी आढावा घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ३३३ मुला-मुलींची संख्या असून यामध्ये ग्रामीण भागात १ लाख ९६ हजार २२३ तर शहरी भागात ३३ हजार ११० आहे. या लसीकरण मोहिमेसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध करण्यात आली आहे.जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये जाऊन आरोग्य यंत्रणा ही लसीकरण मोहीम राबवत आहे. मला विश्वास आहे,साधारणपणे १० दिवसांमध्ये कोल्हापूर शहरातील तर येत्या १५ दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हे लसीकरण पूर्ण होईल.माझी सर्व पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींना विनंती आहे, आपण कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस वेळेत पूर्ण करून घ्यावेत.असे पालकमंत्री म्हणाले.