
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, बीड, नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र असे कार्यक्षेत्र असलेल्या युवा पत्रकार संघाच्या वतीने आपल्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार सोहळा रविवारी २९ मे रोजी कोल्हापुरातील नष्टे लॉन येथे संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक, आदर्श शिक्षक, वैद्यकीय सेवा, कला, क्रीडा,सांस्कृतिक तसेच विशेष म्हणजे विविध प्रसार माध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नूतन आमदार जयश्री जाधव, सिनेअभिनेत्री पुजा जयस्वाल, विद्यमान नगरसेवक राहुल चव्हाण, दिलीप पोवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या नूतन आमदार जयश्री जाधव या कोल्हापूरच्या पहिल्या आमदार म्हणून निवडून आल्याने युवा पत्रकार संघाच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या'” पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. उज्वल भारत बनविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्नशील रहावे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रास्ताविक करताना युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले “युवा पत्रकार संघाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत काम केलेले आहे. युवा पत्रकार संघाच्या या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रसारमाध्यमातील व्यक्तींची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांच्या नोकरीची शाश्वती नव्हती. परंतु युवा पत्रकार संघाने त्यांना मदतीचा हात दिला आहे. इथून पुढे फक्त पत्रकारांच्या हितासाठी व कल्याणासाठी तसेच शासनाच्या विविध योजना युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्रकारांच्या घराचा ही प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहे तोही मागे मार्गी लावण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी सांगितले.कार्यक्रमासाठी प्रदेश अध्यक्ष रतन हुलस्वार, राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी,प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव वळवडे,राज्य सरचिटणीस अजय शिंगे यांनी परिश्रम घेतले.