
कोल्हापूर/ प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सर्व कारभार संस्थेच्या 2019 रोजी दुरुस्त स्कीम मधील तरतुदीनुसार चालतो. दर पाच वर्षांनी निवडणूक लढवून ही कार्यकारणी निवडून येत असते आत्ताचे कार्यकारणी 2016 ते 2021 या कालावधीसाठी होती. 2021 मध्ये माझा कार्यकाळ संपलेला आहे. हा कार्यकाळ संपून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असून सभासदांमध्ये संचालक हे मुद्दाम निवडणूक टाळत आहेत. असा समज झाला आहे. या विरोधात सभासदांनी गावोगावी मोर्चे घेऊन व कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील सर्व सभासद एकत्र येऊन आयोग धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवडणूक घेणेविषयी निवेदन दिले आहे. आज हा पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आम्ही जाहीर करत आहोत असे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. निवडणूक प्रक्रियेस आज पासून सुरुवात होणार आहे. मतदान 20 नोव्हेंबर रोजी असणार आहे तसेच 22 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक समिती नेमण्यात आलेली आहे. ऍड. प्रशांत पाटील, प्रताप परदेशी, आकाराम पाटील, शहाजीराव पाटील आणि सुनील मांजरेकर या पाच जणांची निवडणूक समितीमध्ये निवड करण्यात आलेली आहे.