
*कागलच्या गैबी चौकातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची साद…….*
*बँकेवर बिनविरोध निवडीबद्दल जाहीर सत्कार…..*
*कागल, दि.२१:*
*केडीसीसी बँकेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, शिवसेना, जनसुराज्य आणि मित्रपक्षाचे महाविकास आघाडीचे पॅनेल आकारास येत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी साद ग्राम मविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली आहे. हे पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.*
*बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात कार्यकर्त्यांनी मंत्री मुश्रीफ यांचा जाहीर सत्कार केला. अर्ज माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होणे कामी सहकार्य केलेल्या उमेदवारांचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आभार मानले.*
*मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, केडीसीसी बँकेच्या निवडणुकीत राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून सर्वच पक्ष एकत्र येत आहेत. या रूपाने राज्यामध्ये एक नवा आदर्श निर्माण होत आहे. काल शिवसेनेने बँकेची निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा दुर्दैवी निर्णय घेतलेला आहे. दरम्यान; याआधी शिवसेनेला खासदार संजयदादा मंडलिक व माजी खासदार श्रीमती निवेदिता मानेवहिनी या दोन जागा दिलेल्या आहेत. एक जागा स्वीकृत संचालक म्हणून घेण्याचे वचन दिले होते. परंतु; त्यांना तिसरी जागा निवडणुकीने हवी होती. ती देण्यामध्ये फारच ओढाताण झाली. त्यामुळे, त्यांचाही अद्याप निर्णय झालेला नाही, आम्हीही निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे.*
*श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, माझी बिनविरोध निवड होत असताना खासदार संजयदादा मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याशी सल्लामसलत केली, त्यांचेही सहकार्य झाले. शाहूसाखर कारखान्याचीही निवडणूक सुरू होती. त्यामध्येही आपल्याला मानणाऱ्या चार-पाच लोकांचे अर्ज राहिले होते. त्यांनीही मोठ्या मनाने माघार घेऊन तीही निवडणूक बिनविरोध केली.*
*कागल तालुक्याच्या विकास सेवा संस्थांचा प्रतिनिधी म्हणून गेली तीस-पस्तीस वर्ष केडीसीसी बँकेमध्ये कार्यरत आहे. गेल्या साडे सहावर्षाच्या कारकिर्दीत सर्वच सहकारी संचालकांनी मोठ्या विश्वासाने बँकेची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्यासह सर्व सहकारी संचालकानी बँकेच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेतला नाही. एवढ्या काटकसरीने कारभार केला. संचालक या नात्याने मालक म्हणून नव्हे तर विश्वस्तांच्या भावनेने काम केले. याच पद्धतीचा कारभार भविष्यातही व्हावा एवढीच अपेक्षा आहे.*
*यावेळी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, सुरेश बोभाटे- एकोंडी, दत्ता पाटील व कृष्णात मेटील -सिद्धनेर्ली प्रवीण करनूर, रणजित कांबळे- कसबासांगाव आदी प्रमुख उपस्थित होते.*
*****