
कोल्हापूर:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी फी आकारली जात आहे. वार्षिक फी बद्दलचा निर्णय पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत घेणे कायद्याने बंधनकारक असून देखील फी बद्दल कोणतीही चर्चा बैठकीत घेण्यास शाळा प्रशासन तयार होत नाही. कोरोनाच्या काळातील फी सवलतीबद्दल पालक-शिक्षक संघात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना स्कुलबस मधून मधल्या वाटेत उतरवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य शाळा प्रशासनाने केले आहे. याची तक्रार पोलिसांकडे देखील केली आहे. विद्यार्थी व पालकांची पिळवणूक होत असताना शिक्षण विभागाकडून अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, कोरोनाच्या काळातील फी सवलत द्यावी, पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत ठरेल एवढीच फी आकारावी, एका वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची समान फी घ्यावी, फी आकारणीचा तपशील पालकांना द्यावा, निवारण करण्यासाठी शाळेने ठोस यंत्रणा उभारावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपलसंचालक यांच्याकडे केली.यावर चार दिवसात कार्यवाही नाही झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, दिलीप पाटील, शैलेश लुलानी, राकेश हिंदुजा, दीपा डकरे, गौरव शहा, ब्रिजेश पटेल व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.